कोरोनानंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रात नवा अध्याय सुरू करण्याची गरज : प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे
कोरोनानंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रात नवा अध्याय सुरू करण्याची गरज : प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
सांगली : कोविड-१९ नामक जागतिक महामारी काळाचा तब्बल अठरा महिने अनुभव घेतल्यानंतर आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रथमच महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या आगमनाने गजबजले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने शिक्षण क्षेत्रात नवा अध्याय सुरू करण्याची गरज असून ही जबाबदारी महाविद्यालय समर्थपणे पेलेल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले.
येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी ते बोलत होते. ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालय प्रथमच सुरू होत असून त्यानिमित्ताने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वागत कमान उभारण्यात आली होती. तसेच आकर्षक रांगोळी सुद्धा काढण्यात आली होती. प्रवेश द्वाराजवळ थांबून महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आणि उत्साह दिसत होता.
महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांचे स्वागत केल्यानंतर सभागृहांमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमात बोलताना डॉ. कणसे पुढे म्हणाले की, कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जग होरपळून निघाले. सर्वच क्षेत्रांवर त्याचा अनिष्ट परिणाम झाला. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. कोरोना कालावधीत संपूर्ण जगभर ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला असला तरी त्याच्या अनेक मर्यादाही त्यानिमित्ताने निदर्शनास आल्या. म्हणून कोरोनानंतरच्या काळात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी नवी ऊर्जा घेऊन अध्ययन-अध्यापन कसे सक्षम होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हे करत असताना वारंवार हात धुणे, मास्क लावणे आणि सामाजिक अंतर राखणे या शासनाने घालून दिलेल्या त्रिसूत्री नियमांचे पालन करण्यास विसरू नये याचीही आठवण त्यांनी करून दिली. विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातील पहिला दिवस उत्साहवर्धक व चैतन्यमय व्हावा यासाठी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याचे महाविद्यालयाने ठरवले होते.त्यानुसार आयोजित केलेल्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सौ. प्रभा पाटील यांनी केले तर आभार प्रा. टी. आर. सावंत यांनी मानले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment