तरूणांनी मातृभूमीशी एकनिष्ठ राहण्याची गरज : प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे
तरूणांनी मातृभूमीशी एकनिष्ठ राहण्याची गरज : प्राचार्य डॉ.डी.जी.कणसे
सांगली : माणसाच्या मनात चांगल्या विचारांची बीजे बालपणातच रूजत असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. संमिश्र संस्कृतीत वाढलेले नेहरू हे लहानपणापासूनच उदार, सहिष्णुतावादी वळणाचे होते. म्हणूनच उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. आजच्या तरुणांनी पंडित नेहरूंचे विचार आत्मसात करून मातृभूमीशी एकनिष्ठ राहण्याची गरज आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रतिमा पूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी बोलताना ते म्हणाले की, नेहरूंनी देशाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. आर्थिकदृष्ट्या भारताला सक्षम बनविले. त्याचबरोबर विज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रालाही प्रोत्साहन दिले. नेहरू हे गांधीजींचे निकटवर्तीय होते. भारताच्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्यानंतरचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी पेलली. पंडित नेहरूंना मुलांविषयी अत्यंत प्रेम आणि जिव्हाळा वाटत होता. त्यांचा जन्मदिवस १४ नोव्हेंबर भारतात 'बालदिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या विज्ञान विभाग प्रमुख डॉ. सौ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी.आर. सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. नितीन गायकवाड यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment