मराठी भाषेकडे वस्तुनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून पहावे : डॉ. रणधीर शिंदे
मराठी भाषेकडे वस्तुनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून पहावे : डॉ. रणधीर शिंदे
सांगली : 'भाषाभेद करणे ही अत्यंत चुकीची आणि अवैज्ञानिक स्वरूपाची गोष्ट आहे. भाषा भेदातूनच समाज भेदभावाकडे वाटचाल करत असतो. भाषा ही श्रेष्ठ कनिष्ठ कधीच नसते, ती चिन्हांकित असते. भाषेकडे वस्तुनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.' असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी केले. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ पतंगराव कदम महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ' मराठी भाषा : उपयोजित क्षेत्रे' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाषा विषयाची समज आणि जागरूकता समाजामध्ये यावी याचे एक प्रतिक रूप म्हणून आपण भाषा दिन साजरा करीत असतो. वास्तविक पाहता ही निरंतर स्वरूपाची बाब आहे. कारण ज्या भाषिक समाजामध्ये, भाषिक पर्यावरणामध्ये आपण वावरतो त्याचा संबंध प्रत्येक व्यक्तीशी असतो. ही केवळ विशिष्ट दिनानिमित्त स्मरण करण्याची बाब नव्हे तर तो आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून ज्या भाषेच्या पर्यावरणात आपण जगतो, वाढतो, घडतो ज्याचे भरण-पोषण होत राहते ते कायमस्वरूपी आपल्या विवेकबुद्धीने जतन करण्याची गरज आहे.
भाषा ही जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये जेव्हा विपुल प्रमाणात वापरली जाते तेव्हा त्या भाषेच्या शक्यता, भाषेच्या क्षमता अधिक वाढत असतात. म्हणून भाषेसाठी जीवनाचे कोणतेही क्षेत्र दुर्लक्षित असता कामा नये. उद्योगधंद्याची भाषा, प्रशासनाची भाषा, समाज माध्यमांची भाषा, साहित्याची भाषा, विज्ञानाची भाषा, तंत्रज्ञानाची भाषा अशी जीवनाची सर्व क्षेत्रे भाषेने व्यापलेली असतात. तुमच्या भाषेतील, व्यवहारातील सर्व क्षेत्रे आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या भाषेत करायला पाहिजे. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विस्तार होत आहे. म्हणून विज्ञानाचे शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले पाहिजे. केवळ मराठीविषयी पोकळ अभिमान असता कामा नये तर भाषेच्या वर्तमानाकडे, इतिहासाकडे सजगतेने पाहिले पाहिजे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डी.जी. कणसे होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, आपल्या देशावर परकीयांची अनेक आक्रमणे झाली. त्याचा परिणाम मराठी भाषेवर झाल्याचे दिसून येते. त्याचबरोबर भारत हा विविधतेने नटलेला देश असल्यामुळे अनेक भाषांचा येथे वापर होत आहे. मराठी भाषा ही सर्वसमावेशक भाषा आहे कारण अनेक भाषांना तिने सामावून घेतले आहे. आधुनिक तंत्रज्ञानातही मराठी भाषेने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. कारण मराठी भाषेला उज्ज्वल इतिहासाची परंपरा लाभली आहे. याचा प्रत्येक मराठी भाषिकाला अभिमान असला पाहिजे.मातृभाषेतून विचारांचे आदान-प्रदान करण्यास सोपे जाते म्हणून मातृभाषेचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
यावेळी महाविद्यालयाच्या विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. सौ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. कृष्णा भवारी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शिल्पा साळुंखे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अक्षय खडतरे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment