डॉ.पतंगराव कदम साहेबांना विनम्र अभिवादन
सांगली: येथील डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात भारती विद्यापीठाचे सर्वेसर्वा, कुलपती, डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या जयंती निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी प्रतिमेचे पूजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कणसे म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या अंगी नेतृत्वाबरोबरच दातृत्वाचे गुण होते. त्यांनी हजारो गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क माफ केली. सर्वसामान्य कुटुंबातील मुलं शिकून मोठी व्हावीत हा त्यांचा उदात्त हेतू होता. भारती विद्यापीठाची स्थापना करून सर्वसामान्य विद्यार्थ्यालाही उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे ही साहेबांची महत्वकांक्षा होती. म्हणूनच हजारो विद्यार्थी भारती विद्यापीठात उच्च दर्जाचे शिक्षण घेत आहेत. 'गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन' हे संस्थेचे ब्रीद वाक्य साहेबांनी सत्यात उतरविले आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची पदे भूषविली आणि या पदांवर असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी केली. म्हणून सर्वच क्षेत्रातील त्यांचे कार्य आजही अजरामर आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श तरुण पिढीने घ्यायला हवा असा संदेश त्यांनी दिला .या वेळी महाविद्यालयाचे कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा. करून जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. नितीन गायकवाड, डॉ. वर्षा कुंभार, प्रा. सतीश कांबळे, प्रा. नंदकुमार नाटके यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment