महात्मा जोतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली : डॉ. डी.जी. कणसे
महात्मा जोतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली : डॉ. डी.जी. कणसे
सांगली : गुलामगिरीच्या काळात अज्ञान आणि अशिक्षितपणामुळे स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान होते. त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होत होते. अशा कठीण परिस्थितीत महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि समस्त स्त्री जगताचा उद्धार केला. असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी.कणसे यांनी केले.
येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रतिमा पूजन कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी आणि तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचविण्यासाठी महात्मा फुले आयुष्यभर झटले. न्याय आणि समानता यावर आधारलेली समाजरचना अस्तित्वात आणण्याचा ध्येयवाद त्यांनी अंगिकारला होता. सतीची चाल, बालविवाह, केशवपन यांसारख्या अनिष्ट प्रथांविरूद्ध त्यांनी बंड पुकारले. म्हणून समाजाने त्यांचा 'महात्मा' म्हणून गौरव केला. त्यांचे सत्यशोधकीय विचार समाजाने आचरणात आणले पाहिजेत.'
या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. नितीन गायकवाड यांनी केले होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजीराव बोऱ्हाडे, डॉ. अमित सुपले, प्रा. टी. आर. सावंत व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment