डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे थोर शास्त्रज्ञ तथा भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणादिन साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या 'राज्याभिषकाचे हिंदूस्थानाच्या इतिहासातील स्थान' या लेखाचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस.व्ही.पोरे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, 'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त संपूर्ण भारतात वाचन प्रेरणादिन साजरा केला जातो. भारतात तरूणांची संख्या जास्त आहे. आजच्या तरूणांनी विविध क्षेत्रांत संशोधन करून देशाचे नावलौकिक वाढवले पाहिजे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना वाचनाची प्रचंड आवड होती. वाचनामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. महाविद्यालयातील मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हा दिवस वाचन प्रेरणादिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त डॉ.पोरे पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तुंग कार्याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. त्यांनी आपल्या राज्यामध्ये सर्वधर्मसमभाव ठेवून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. तसेच भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांनी वयाच्या १८ व्या वर्षी भारती विद्यापीठ ही आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण संस्था स्थापन करून समाजाच्या तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याचे महत्कार्य केले आहे. शिक्षणामुळेच समाजात परिवर्तन होते ही त्यांची दृढ धारणा होती. म्हणून पतंगराव कदम यांनी सर्वप्रथम शिक्षण आणि वाचनाला महत्त्व दिले. काळाची पावले ओळखून त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन देश-विदेशात अनेक शैक्षणिक संकुले, ग्रंथालये उभारली.' यावेळी प्रा. एस. बी. पाटील व प्रा. अमोल वंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या कार्याबद्दल आपले मनोगते व्यक्त केली.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.अरूण जाधव, प्रा. संजय ठिगळे, एन.एस.एस. प्रमुख डॉ. विकास आवळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा.जयश्री हाटकर यांनी केले. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या मजकुराचे वाचन प्रा.रोहिणी वाघमारे व डॉ. वंदना सातपुते यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रूपाली कांबळे यांनी केले. आभार डॉ. महेश कोल्हाळ यांनी मानले. या कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथालय विभाग, एन.सी.सी.आणि एन.एस.एस. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment