डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथे महाराष्ट्र शासनाच्या परिसस्पर्श योजने अंतर्गत कार्यशाळा संपन्न
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथे महाराष्ट्र शासनाच्या परिसस्पर्श योजने अंतर्गत कार्यशाळा संपन्न
सांगली : भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियान आणि डिपार्टमेंट ऑफ हायर अँड टेक्निकल एज्युकेशन गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र, मंत्रालय मुंबई आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'परिसस्पर्श' या योजनेअंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डायरेक्टर डॉ. एस. डी. डेळेकर, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय पोरे व मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एल. बेलवटकर आदी मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. एस. डी. डेळेकर उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाबरोबरच प्रत्येक महाविद्यालयाला नॅक पुनर्मूल्यांकनाला सामोरे जावे लागते. या प्रक्रियेला सामोरे जात असताना महाविद्यालयांपुढे अनेक आव्हाने असतात. तसेच नॅक पुनर्मूल्यांकनात अनेक वेळा बदल होत असतात. म्हणून ही प्रक्रिया नीट समजून घेऊन या प्रक्रियेतील प्रत्येक घटकाने जबाबदारीचे गांभीर्य लक्षात घेऊन काम केल्यास ती सुलभ होईल. या प्रक्रियेत विद्यार्थी हा केंद्रस्थानी घटक मानला आहे. त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने महाविद्यालयाने कोणत्या योजना राबवल्या आहेत किंवा कोणत्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी केली आहे हे पाहिले जाते. या वर्षापासून नॅक पुनर्मूल्यांकन करताना सात निकषांच्या ऐवजी दहा निकष असणार आहेत. त्यावर सविस्तर मार्गदर्शन डेळेकर यांनी केले. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय पोरे म्हणाले की, 'परीसस्पर्श' या योजनेचा खरा उद्देश एकमेकांतील चांगल्या गोष्टींची देवाण-घेवाण व्हावी, एकमेकांना सहकार्याची भूमिका असावी हाच आहे. त्यामुळे नॅक पुनर्मूल्यांकनाला सामोरे जाताना एकमेकांशी संवाद साधने फार महत्त्वाचे असते. त्यामुळे प्रत्येकवेळी आपणाला काहीतरी नवीन शिकायला मिळते. अलिकडे या मूल्यांकनामध्ये जो बदल झाला आहे त्याचा सूक्ष्म अभ्यास करून शिवाजी विद्यापीठाने सोपवलेल्या सर्व मेंटी महाविद्यालयाची नॅकची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याची ग्वाही मेंटार महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून डॉ. संजय पोरे यांनी दिली. त्याचवेळी केंद्र शासन, राज्य शासन, विद्यापीठ व जिल्हा स्तरावरून येणार्या सर्व मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करून प्रत्येक महाविद्यालय शैक्षणिक दृष्ट्या अपग्रेड करण्याचे अवाहनही त्यांनी सर्व मेंटी कॉलेजच्या प्राचार्यांना केले. या कार्यशाळेचे नियोजन महाविद्यालयातील परीसस्पर्श योजनेचे समन्वयक डॉ. नितीन गायकवाड यांनी केले.
या कार्यशाळेस सांगली जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्य आणि अंतर्गत गुणवत्ता हमी विकास योजनेचे समन्वयक उपस्थित होते. या कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अमित सुपले यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.भारती भावीकट्टी यांनी केले तर तांत्रिक सहाय्य श्री. अमोल वंडे यांनी केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment